Friday, February 6, 2009

मराठ्यांना आरक्षण ही काळाची गरज

मराठा जातीच्या इतिहासाला जवळजवळ 2 हजार वर्षांपूर्वीच्या काळापासून ऐतिहासिक संदर्भ मिळतात. इ.स. पूर्वकाळातील मौर्य वंशापासून नंतरच्या सातवाहन, क्षत्रप तसेच अलिकडच्या चालुक्य आणि यादव वंशाच्या राजापर्यंत या मराठा जातीचे वर्चस्व दिसून येते. तेराव्या शतकाच्या अखेरीस यादव सत्तेचा पाडाव केल्यानंतर ते थेट सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेपर्यंत मुस्लिमांनी राज्य केले. त्यानंतर पुन्हा जवळजवळ 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केले. या काळात राज्यकर्त्यांनी जातीभेदाचेच राजकारण करून राज्य केले. इंग्रज तर जाता-जाता आमच्यामध्ये जाती-जातीत भांडणे लावून गेले. भारताला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली. तरीही जाती-पातींचे राजकारण आजही सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला न्याय मिळावा म्हणून घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्या आरक्षणाचे राजकारण करून आजमितीस प्रत्येक राजकीय नेता सत्तेची फळं उपभोगत असताना ज्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली ते गोरगरीब मात्र आजही दारिद्रयांमध्ये खितपत पडले आहेत. सांगायचा मुद्दा हाच की, ज्याला शक्य झाले त्याने आपली प्रगती साधली. परंतु बाकीचा समाज मात्र कायम उपेक्षितच राहिला. हीच परिस्थिती आज मराठा समाजाचीही आहे.
स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवणारी, स्वामीनिष्ठ, दिलेल्या शब्दाला जागणारी, मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण हटणार नाही, अशी बिरुदावली बाळगणारी जात म्हणजे मराठा. ब्रिटीशांची सत्ता येईपर्यंत जवळजवळ 150 वर्षे मराठ्यांनी महाराष्ट्रात राज्य केले. मोगल काळात आणि पुढे इंग्रज काळातही या मराठा समाजातील काही मंडळींनी आपला दबदबा कायम ठेवला होता. तेव्हा शिपाई, मावळा, मराठा, पाटील, देशमुख, सरदार हे मराठा म्हणून गणले जात. त्यातूनच पुढे व्यवसायावरून जाती पडल्या. शेती कसणाऱ्यांच्या काही भागात कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, तिलोरी कुणबी अशा विविध पोटजाती तयार झाल्या. सांपत्तीक स्थिती आणि सामाजिक दर्जा यानुसार अनेक स्तर तयार झाले. ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर मुलुखगिरी गेली. इनामे खालसा झाली. सरंजामशाही, राजेशाही संपल्याने मराठा जातीतील ज्या मूठभर लोकांकडे शेतजमीन, संपत्ती, सामाजिक स्थान वंश परंपरेने चालत आले होते असा वर्ग अधिक पुढारला गेला. मात्र तळागाळातील बहुसंख्य मराठा समाज हा अधिकच मागासला. या आपल्याच मागासलेल्या समाजाला विविध आमिषे दाखवून मुठभर उच्चभू्र मराठ्यांनी कधी पैसा दाखवून तर कधी सामाजिक भांडवल करून उच्च स्थाने पटकावली. राजकारणात मुसंडी मारली. परंतु या मंडळींनी आपल्या समाजाकडे विशेष लक्ष न दिल्याने बहुसंख्य मराठा समाजाची अवस्था आजही दयनीयच आहे. प्रत्येक वेळी मराठा म्हटल्यावर या मूठभर लोकांचीच उदाहरणे दिली जातात. परंतु प्रत्यक्षात शेतीवर अवलंबून असलेली अनेक मराठा कुटुंबे गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून अल्पभूधारक तसेच काही भूमीहीन झाले आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक मराठा आहेत. रोजगार हमी योजना, शेजमजुरी, माथाडी तसेच इतर ठिकाणी मजुरी करणाऱ्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक लोक हे मराठा जातीचे आहेत. शैक्षणिकदृष्ट्या ही मराठा जात खूपच मागासलेली आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तळागाळापर्यंत करणारी मंडळी मराठा समाजातील असूनही शिक्षणाच्या अभावामुळे नोकरीतील प्रमाण फक्त अडीच ते तीन टक्के आहे. ही जात खुल्या वर्गात मोडत असल्याने शिक्षणाकरीता प्रवेश अगदी शाळेपासून, इंजिनियरींग, आय.टी., मेडीकल, आयआयएमपर्यंत आणि नोकऱ्यांपासून पदोन्नतीसाठीही प्रखर स्पर्धेस तोंड द्यावे लागत आहे. आज मराठा समाज व्यसन, राजकारण आणि खोट्या प्रतिष्ठेच्या विळख्यात सापडला आहे. मराठा समाजात खोट्या प्रतिष्ठेचा पीळ कायम आहे. मद्यपान करणे म्हणजे मर्दुमकी असा मराठा समाजातील पुरुषांचा समज आहे. त्यामुळे श्रीमंत असो वा गरीब बहुतेकजण दारूच्या आणि इतर व्यसनांच्या आहारी गेलेले. एवढे करून सवरून घरी गेल्यानंतर पत्नीला, पोरांना मारहाण, शिव्या, शेजाऱ्यांशी भांडणे हे ठरलेले आहे. काही मराठ्यांना राजकारणाची मोठी हौस. या हौसेपायी काही आमिषे दाखवणाऱ्यां नेत्यांच्या पाठी हे सतत फिरत असतात. नेत्यांच्या नादी लागून अनेकवेळा इतरांशी संघर्ष करतात. तोडफोड, हाणामाऱ्या, दमबाजी अशा प्रकारातून हे तरूण अंगावर पोलीस केसेस ओढवून घेतात. एकदा पोलीस केस झाली की, पुढचे संपूर्ण आयुष्य बरबाद होते. त्यावेळी यांचे नेते इतरांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यात दंग असतात. यांचा वाली कोणीच नसतो. वारंवार धक्के बसूनही हा मराठा सुधारायला तयार नाही, याला जबाबदार कोण?
आज अनेक मराठा नेत्यांना शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज बऱ्याच शिक्षणसंस्था बहरलेल्या दिसतात. परंतु तेथे फक्त पैशाची भाषा चालते, हीच खरी शोकांतिका आहे.
राजकीय पटलावरील सद्य परिस्थिती पाहता येत्या एक-दोन निवडणुकींनंतर मराठ्यांचे वर्चस्व नेस्तनाबूत होईल, असे चित्र दिसते. सध्याची बहुतेक मंडळी पूर्वपुण्याईवर तग धरून आहेत. राज्यातील 33 जिल्हा परिषदांपैकी एक तृतीयांश जागाही मराठ्यांकडे नाहीत. 90 टक्के मराठा जातीची लोकसंख्या असलेल्या गावात 15-20 वर्षे मराठा सरपंच नाही. आमदारांची संख्या आताच 25-30 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी आता मराठ्यांमधील 96 कुळी, पंचकुळी, सप्तकुळी, देशमुख, पाटील, सरदार, राजांनी स्वत:ला कमीपणा वाटून घेण्यात काहीच हरकत नाही. लाजही वाटायचे काही कारण नाही. आपल्या समाजाच्या हितासाठी, आपल्याच तळागाळातील गोरगरीब बांधवांसाठी आरक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला लाज वाटत असेल, संकोच वाटत असेल तर निदान गप्प बसा, जी मराठा समन्वय समिती व इतर मराठा संघटना संघर्ष करीत आहे त्यांच्यामध्ये "खो' तरी घालू नका, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. आज संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारनेही नमते घेतले आहे. मग काही मूठभर मराठ्यांचा विरोध का? तुम्ही गप्प बसावं, हेच शहाणपणाचं ठरेल, अन्यथा संतप्त मराठ्यांकडून तुम्हाला चांगलाच धडा शिकवला जाईल, ही आमची पोकळ धमकी नव्हे, कारण पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. तेव्हा गप्प राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे, आणि हाच तुमच्यासाठी मोलाचा सल्ला आहे.