Thursday, January 1, 2009

नवे वर्ष-नवे प्रकल्प-नवे संकल्प

नववर्षाचे स्वागत करताना तुमच्या मनात नक्की काही नवे निश्र्चय करण्याचा विचार तरंगत असणार.हे नवे वर्ष सुखाचे, समृद्धीचे, यशाचे, ध्येयपूर्तीचे जावो अशा शुभेच्छा तुम्हाला देत असतानाच आम्ही तुम्हाला कोणते निश्र्चय तुम्ही स्वत:शी करावेत याबाबत मार्गदर्शक टिप्स देतो आहोत. हे इथे सूचिबद्ध केलेले सर्वच्या सर्व निश्र्चय तुम्ही कराल, पाळाल असे नाही, पण जेवढे जास्त निश्र्चय कराल आणि अंमलात आणाल तेवढी तुमची अधिक स्वप्ने साकार होतील हे मात्र नक्की. तर मग ही घ्या "निश्र्चय सूची' नववर्षाच्या शुभेच्छांसह!
* रोज किमान एक वृत्तपत्र आणि पुस्तकांची 25 पाने वाचीन.
* रोजच्या रोज दैनंदिनी लिहून दिवसभरातील घटनांची आणि चुकांची अंतर्मुख होऊन नोंद करीन, उद्या स्वत:च्या विकासासाठी काय करणार त्यापैकी एका मुद्दयाची, कृतीची नोंद करीन.
* मी "पॉझीटीव्ह थिंकींग' करीन निगेटीव्ह विचार, भावना आणि व्यक्तींना थारा देणार नाही.
* मी सर्व अपॉइंटमेंटस्‌, वेळा आणि दिलेले शब्द सबबी न सांगता पाळीन, जी पुरी करण्याची माझी इच्छा, क्षमता नाही अशी आश्र्वासने मी कुणालाही देणार नाही.
* इतरांनी ज्याप्रकारे मला मदत करावी असे वाटते तशी मदत मी पुढाकार घेऊन इतरांना करीन.
* माझ्या चुका मी कबूल करीन आणि सुधारीन.
* मी माझे आणि माझ्याभोवतीच्या लोकांचे मन प्रसन्न ठेवीन.
* दुसऱ्यांमध्ये मी चांगले गुण शोधीन, दोष, उणीवा, चुका शोधून पूर्वग्रहाने कुणाशी वागणार नाही.
* माझ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारून वेळेवर पार पाडीन.
* कुठलीही गोष्ट फुकट घेणार नाही.
* रोज 15 मिनिटे व्यायाम, योगासने, ध्यान करीन.
* भाषण, संभाषण कौशल्य जाणीवपूर्वक विकसीत करीन, दुसरा नाराज, नाऊमेद होईल असे बोलणार नाही.
* भीती, शंका, संशय, मत्सर, द्वेष याला थारा देणार नाही.
* मित्र, नातेवाईकांशी समक्ष भेटी, फोन, एस.एम.एस. द्वारा सतत संपर्कात राहून संबंध वाढवीन.
* लोकांना जाणीवपूर्वक खुश करण्यासाठी चांगले वागेन, बोलेन, त्यांची स्तुती, प्रशंसा करीन व आपला ग्रुप बांधीन.
* दर महिन्याला किमान 1 मराठी नाटक किंवा चित्रपट पाहीन, 1 पुस्तक वाचून पूर्ण करीन.
* मातापित्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करीन.
* मुलांना स्वातंत्र्य देऊन व्यक्तिमत्वविकासासाठी संधी, प्रशिक्षण, संस्कार देईन.
* आठवड्यातील किमान 1 तास माझ्या छंदासाठी देईन.
* आठवड्यातून 2 तास माझा स्वार्थ नसलेल्या समाजकार्यासाठी देईन.
* आळशीपणा, वेळ वाया घालवणे, चकाट्या, रिकामटेकड्या गप्पा, व्यसनात वेळ वाया घालवणार नाही.
* मी चुगल्या करणार नाही, हलक्या कानाने कुणाचे ऐकून कुणाबद्दल माझी मते बनवणार, बदलणार नाही.
* शिव्या देणार नाही, अपशब्द संभाषणात वापरणार नाही.
* रोज एका तरी व्यक्तीला प्रसंगोचित शुभेच्छा देईन.
* रोज 1 तास कुटुंबीयांना देईन.
* रोज 1 जेवण किंवा नाश्ता टी.व्ही.न लावता एकत्र कुटुंबाबरोबर घेईन.
* दर दोन महिन्यातून एखाद्या सुट्टीला कुटुंबासह सहलीला जाईन.
* माझ्या देव-दैवत-साधुपुरुषाच्या ध्यान-पूजेत रोज 10 मिनिटे व्यतित करीन.
* दर सहा महिन्यांनी रक्त इ. आरोग्य तपासणी करून घेईन.
* वर्षभरात एकदाही अपचन होईल एवढे खाणार नाही.
* मी आवश्यक त्या रक्कमेचा माझा विमा उतरवीन.
* निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आत्तापासून गुंतवणूक करीन.
* नियमित बचत करीन.
* नियमित कर्जफेड करीन.
* अकारण फोन, मोबाईल गरजेपेक्षा जास्त वापरणार नाही.
* उत्तम श्रोता बनेन, लोकांचे ऐकून घेईन, कमी बोलेन.
* माझ्या चुकीची क्षमा मांगेन, दुसऱ्याला क्षमा करेन.
* नेहमी हसतमुख राहीन.
* कंजुष क्षुद्रवृत्तीने वागणार नाही.
* खरा मित्र बनेन, खरे मित्र जोडून, सांभाळेन.
* दिलेले, सोपवलेले काम निष्ठेने विचारपूर्वक करीन.
* कार्यालयातील प्रश्र्न घरी व घरचे प्रश्र्न कार्यालयात "नेणार' नाही.
* आकर्षक दिसण्यासाठी पोषाख, चष्मा, मेकअप्‌, बॉडी लॅंग्वेज, पर्सनॅलीटीची काळजी घेईन.
* अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुणाला भेटणार नाही.
* मी, माझे, मला ऐवजी आपले, आपण बोलेन.
* लोकांशी स्वत:विषयी न बोलता त्यांच्या विषयी बोलेन.
* लोकांना ते कुणीतरी खास व्ही.आय.पी.आहेत अशी वागणूक देईन.
* लहानसहान गोष्टींकरिता न चुकता लोकांना धन्यवाद देईन.
* लोकांची नावे, जन्मतारखा लक्षात ठेवीन.
* वादाचे मुद्दे टाळीन, भांडणे करणार नाही.
* चांगले बोलता आले नाही तरी वाईट बोलणार नाही.
* प्रामाणिकपणे उदारपणे लोकांचे कौतुक करीन.
* दरमहा काहीतरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी जोड व्यवसाय करीन.
* हॉटेलमध्ये कमीतकमी खर्च करीन/ जाईन.
* शक्य तेव्हा स्वत:च्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनाने प्रवास करीन.
* लग्न, समारंभांवर उधळपट्टीने खर्च करणार नाही.
* बढाया, थापा, गमजा, वल्गना करणार नाही.
* रोज मॉर्निंग वॉकला जाईन.
* मी आजचे काम उद्यावर ढकलणार नाही.
* मी पाणी, वीज, पेट्रोल वाया घालवणार नाही.
* मी एखादे तरी झाड लावून जगवीन.
* मी कोणत्यातरी संस्था, संघटनेचा सदस्य म्हणून सक्रीय सामाजिक, सांस्कृतिक काम करीन.
* पूर्वतयारी शिवाय मी कोणतीही गोष्ट करणार नाही.
* आयुष्य ही एक महत्त्वाकांक्षा समजून पूर्ण करीन.
* आयुष्य हे एक साहस समजून मी धाडस करीन.
* आयुष्य हे एक कार्य समजून ते तडीस नेईन.
* आयुष्य हा एक संग्राम आहे असे समजून लढेन.
* आयुष्य ही सुंदर गोष्ट आहे असे समजून उपभोग घेईन.
* आयुष्य हे एक आव्हान समजून त्याला सामोरा जाईन.
* आयुष्य हे एक कर्तव्य समजून ते पूर्ण करीन.
* आयुष्य हा एक डाव आहे असे समजून तो खेळेन.
* आयुष्य हा एक जुगार आहे असे समजून तो जिंकेन.
* आयुष्य हे एक बक्षीस आहे असे समजून स्वीकारेन.
* आयुष्य हे एक ध्येय आहे असे समजून साध्य करीन.
* आयुष्य ही एक जोखीम समजून स्वीकारेन.
* आयुष्य हा एक प्रवास आहे असे समजून चालत राहीन.
* आयुष्य हा एक ऐषाराम आहे असे समजून आनंद घेईन.
* आयुष्य हे एक रहस्य आहे समजून उलगडण्याचा प्रयत्न करीन.
* आयुष्य ही एक सुसंधी आहे समजून फायदा घेईन.
* आयुष्य हा प्रश्र्न समजून त्याचे उत्तर मिळवीन.
* आयुष्य हे एक वचन आहे असे समजून ते पूर्ण करीन.
* कोणता तरी खेळ खेळून त्यात प्राविण्य मिळवीन.
* निर्णय घेण्यापूर्वी विचार करीन, निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहीन.
* मी कुटुंबाला विश्र्वासपात्र वाटेन असे वागेन.
* मी श्रीमंत होईन.
* मी अंधश्रद्धा सोडीन, डोळसश्रद्धा ठेवीन.
* मी बुवाबाजी, तंत्रमंत्र, जादूटोण्यामागे लागणार नाही.
* मी चुकून शरीराने आजारी पडलो तरी मनाने रोगट होणार नाही.
* मी आहारात पालेभाज्या, फळे, कडधान्ये खाईन.
* तळलेले पदार्थ, मसालेदार, अतिगोड पदार्थ टाळीन.
* आहारातील साखर, मीठ कमी करीन.
* वाजवीपेक्षा जास्त झोपणार नाही, जागरणे करणार नाही.
* दिवसाला 12/15 ग्लास पाणी पिईन.
* आवश्यक तेवढी विश्रांती घेईन.
* उंचीच्या प्रमाणात आदर्श वजन ठेवीन.
* आठवड्यातून एकदा तरी उपवासाचे पदार्थही न खाता लंघन-उपास करीन.
* रोज रात्री झोपण्यापूर्वी स्नान करीन.
* एखाद्या जिवंत व्यक्तीला गुरू मानून त्यांचा सल्ला वेळोवेळी घेईन.
* अकारण आक्रमक, आक्रस्ताळेपणाने वागणार नाही, नेहमीच सौजन्याने, साभ्यतेने वागेन.
* मी भूतकाळातील चुका मान्य करीन, पण त्यासाठी पश्र्चात्ताप करीत, न्यूनगंडाने वागणार नाही.
* लहान प्रश्र्नांचा मी मोठा बाऊ करणार नाही.
* मी माझ्या कामात इतरांना सहभागी करून घेईन.
* मी तणावमुक्त राहण्याची सवय मनाला लावीन.
* मी नाही म्हणायला शिकेन, कुणाच्या नाहक दबावाखाली हो म्हणणार नाही.
* मी रोज सकाळी आजच्या कामांची यादी करून रात्री त्यांचा जमाखर्च मांडेन.
* मी परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही तरी मन:स्थिती काबूत ठेवीन.
* मी कॉम्प्युटर, इ-मेल, वेबसाईट यांचा वापर करून माझे माहिती व जनसंपर्क वाढवीन.
* मी सर्वांच्या नजरेत भरण्यासाठी दक्ष राहीन पण कुणाच्याही नजरेत खुपणार नाही याचीही काळजी घेईन.
* मी लोकप्रिय व्यक्ती बनण्याचा माझ्याशी संपर्क-संबंध येणाऱ्या वर्तुळात प्रयत्न करीन.
* मी दरमहा एकातरी महत्त्वाच्या व्यक्तीची ओळख करून संपर्कात राहीन.
* मी महिन्यातून एकदा तरी माझ्या देव-दैवताच्या देवळात जाऊन प्रार्थना करीन.
* मी पुढच्या 31 डिसेंबर 2009 पर्यंत आज आहे त्यापेक्षा अधिक यशस्वी असेन!