Saturday, November 15, 2008

मुंबई मित्र एक सिंहावलोकन

राज्याची परिस्थिती हालाखीची बनत चालली आहे. गोरगरिब जनता उध्वस्त झाली आहे. कारखानदारांचे वीज भारनियमनामुळे पार वाटोळे झाले. शेतकरी आत्महत्या करताहेत, सरकारी कर्मचारी पगाराच्या आशेवर दिवस मोजताहेत, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ अशा एक ना अनेक संकटांना तोंड देताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आलेत. जोपर्यंत या महाराष्ट्रातील गोर-गरीब जनतेवर अन्याय, अत्याचार चालू आहे. देशातील परिस्थितीही फार चांगली नाही. राजकारणात घोडेबाजार सुरू आहे. तसेच अतिरेक्यांचे थैमान मुंबईतून बंगळूर, व्हाया अहमदाबादपर्यंत पोहचले आहे. महागाईने भविष्य काळवंडलेय. म्हणूनच आमची लेखणी आग ओकतेय. जोपर्यंत देशातील गोरगरिब जनता भरडली जातेय, तोपर्यंत
आमची लेखणी अशीच धडधडत राहील आणि भारतियांच्या जीवावर उठलेल्या या हरामखोर शत्रूंवर अंगार ओकत राहिल हे निश्चित! दै. "मुंबई मित्र'चा हा तिसरा वर्धापन दिन आहे. मराठी माणसांच्या विचारांचे खरेखुरे प्रतिनिधित्त्व करणारा हा मित्र आहे.तो अन्याय आणि अत्याचाऱ्यांच्या मागे हातोडा घेऊन फिरतोय. भविष्यातही "मुंबई मित्र'चे मालक, संपादक अभिजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तो असाच फिरत राहिल, नव्हे तो अधिक आक्रमक होईल हेही निश्चितच.
मुंबई मित्रच्या नावलौकीकासाठी वाचकांनी जे अपार प्रेम दाखविले, जनताजनार्दनाचा पाठींबा, वृत्तपत्र विक्रेत्यांचे सहकार्य लाभले, ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे दै."मुंबई मित्र' परिवारातर्फे मी आभार मानतो. आज मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात "मुंबई मित्र' पोहचला आहे. अल्पावधीतच लाखों वाचकांचा "प्रिय मित्र' ठरलेला दै. "मुंबई मित्र हा महाराष्ट्रातील एक चमत्कार आहे. आपले सहकार्य, मदत आम्हाला असेच मिळाल्यास तमाम जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहो. तुमच्या आशीर्वादाने आम्ही उत्तुंग भरारी मारली असून ही यशस्वी घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहील. आमचे हितशत्रू आमच्याकडून काही चुका होतात का, याची डोळ्यात तेल घालून वाट पहात आहेत. पण त्यांच्या हयातीत हे शक्य होणार नाही. दैनिक चालविण्याचे काम अत्यंत जबाबदारीचे तसेच धोक्याचेही आहे. परंतु आम्ही कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सत्य परिस्थिती रोखठोकपणे मांडतो. कोठेही सत्य न दडविता ते आहे त्या स्वरूपात जनतेसमोर उघडे करतो. त्यामुळे आम्हाला अनेकवेळा धमक्या मिळाल्या. पण आम्ही घाबरणारे नाही. कारण तमाम मराठी जनता आणि जागृत भैरी भवानी मातेचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. त्यामुळेच दै. "मुंबई मित्र'ने विविध क्षेत्रातील अनेक पापी लोकांच्या भानगडी चव्हाट्यावर आणल्या. सत्यनिष्ठ नि कर्तव्यबुद्धी या दोन भावना आणि समाजजागृतीचे ध्येय साध्य करण्याची प्रबळ इच्छा यामुळेच "मुुंबई मित्र' हे कार्य नेटाने करीत आहे. आमचे मालक अभिजीत राणे म्हणजे ढाण्या वाघच. शिवकालात असतो तर या ढाण्या वाघाने आपल्या वाघनखांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पुढाऱ्यांचे कोथळे बाहेर काढले असते. ते शक्य नसल्याने आम्ही त्यांचे बिंग वृत्तपत्राच्या माध्यमातून फोडीत आहोत, व यापुढेही फोडणार. महाराष्ट्राच्या हितशत्रूविरुद्ध आम्ही पोटतिडकीने लिहीणारच.
"माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृताते पैजा जिंके। ऐसी एक एक अक्षरे। रसिके मेळविन।।' अशी मोक्ष प्राप्त करून देणारी अमृतमधूर भाषा ज्या ज्ञानेश्वरांनी निर्माण केली, त्याचप्रमाणे "भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।' अशा तऱ्हेच्या ढोंगी लोकांचे सोंग ज्यांनी समाजापुढे आणून लोकजागृती केली ते संत तुकाराम महाराज. "मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा। हे विषयी कैचा-' "धटाशी असावे धट। उद्धटाशी उद्धट।' अशा प्रकारची रग समर्थांनी मराठी भाषेत आणली. या मराठी भाषेचा वसा जपतच आम्ही भ्रष्टाचाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.
मुंबईतून सुरू झालेले हे दैनिक अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि लाखो वाचक आमचे मित्र बनले. आम्ही अत्यंत
आक्रमकपणे सत्तालोलुप पुढाऱ्यांवर, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, स्वार्थी पत्रकारांवर आणि खतरनाक गुन्हेगारांवर आमच्या लेखणीचे आसूड ओढले आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते हे सगळे एकत्र आले आहेत. आम्हाला संपवण्यासाठी "देव पाण्यात घालून' बसले आहेत. यासाठी त्यांनी आम्हाला पैशांची लालूच दाखवली. मग धमक्या दिल्या. तरीही आम्ही बधेनात म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. परप्रांतीयांनी तर नको-नको तेवढा त्रास दिला. परंतु आम्ही निर्भिडपणे लिखाण केले. त्यामुळेच सर्वसामान्य वाचकांच्या आशिर्वादाने या सर्वांचे प्रयत्न निष्फल ठरले. वाचक आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठींब्यावर आम्ही कमालीचे यशस्वी झालो. वाचकांच्या कृपाशिर्वादानेच आम्ही गरूड भरारी मारली आणि दै.ङ्घमुंबई मित्र'च्या मराठी व हिंदी आवृतीच्या जोडीला दै. "वृत्तमित्रच्या' मराठी व हिंदी आवृत्याही काढल्या. इंग्रजीतही आम्ही पदार्पण केले. शेठजींची मक्तेदारी मोडीत काढून आम्ही वृत्तपत्रांची साखळी उभी करण्यात यशस्वी ठरलो. आतातरी विरोधकांच्या हे लक्षात आले असेल असे वाटते. आम्ही खूप पुढील घोडदौड केली. मात्र आमचे विरोधक जेथे आहेत तेथेच डबक्यात रांगताहेत.आता "मुंबई मित्र' आणि "मुंबई मित्र' चा वाचक वर्गच आमचा खराखुरा मित्र आहे. त्याच्या बळावरच आमची वाटचाल पुढे सुरू आहे. त्यानेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले, प्रेम दिले, पाठिंबा दिला, आशिर्वाद दिला. म्हणूनच जेव्हा जेव्हा आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभे ठाकलो, तेव्हा तेव्हा त्यांनीच आम्हाला शाबासकी दिली. याचा संबध इतिहास सांगायचा म्हटले तर संपूर्ण अंक सुद्धा कमी पडेल. याचे एकूणच सिंहावलोकन करायचं म्हणजे कठीण काम आहे. परंतु काही प्रकरणे आवर्जून सांगाविशी वाटतात.
परिवर्तन, बदल हा तर सृष्टीचा नियम आहे. असेही म्हणतात की काळानुरुप सगळ्या गोष्टी बदलतात. गेल्या काही वर्षात मुंबई सुद्धा खूप बदलली. गिरगावमध्ये छोट्या खोलीत राहणारी मराठी माणसं मोठ्या घरांच्या मोहाने ठाणे, डोंबिवली, कल्याणपर्यंत तर इकडे वसई, विरारपर्यंत गेली. मुंबईतली व्यापारी पेठही बदलली. किराणा मालाची जागा "बिग बाजार', "शॉपिंग मॉल'ने घेतली. मुंबईची औद्योगिक अस्मिता असलेले "गिरणगाव' हे बिरुददेखील या नवीन संस्कृतीच्या डोळ्यात खुपू लागले आणि गिरणगाव पार बदलून गेले. एकामागोमाग एक मिल बंद पडल्याने मुंबईच्या गिरणगावाला अवकळा आली. गिरण्यांचा हा औद्योगिक कारभारच बंद पडल्यावर गिरणी कामगारांची कुटुंबे अक्षरश: रस्त्यावर आली. अनेक कुटुंबांची पार वाताहत झाली. परंतु काही घडलेच नाही अशा आविर्भावात मिलच्या जमिनींचा लिलाव होतोय आणि गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागतोय. या गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर दै. "मुंबई मित्र' मधून परखड मते मांडण्यात आली. गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे अध्यक्ष किशोर देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून गिरणी कामगारांचे महत्त्वाचे प्रश्न आम्ही उचलून धरले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, कामगार नेते आ. भाई जगताप यांच्यामार्फत अनेक ज्वलंत प्रश्नांना दै. "मुंबई मित्र'च्या माध्यमातून वाचा फोडली. कामगारांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल याची सविस्तर चर्चा करून तशाप्रकारे लेख व बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे कामगार वर्गात दै.ङ्घमुंबई मित्र' चे आपले एक आगळे वेगळेे स्थान निर्माण झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात आणि ते जागतिक सत्य आहे. मुंबईतही निवारा ही मोठी समस्या आहे. मुंबईत माणूस उपाशी राहत नाही, परंतु त्याचा सतत संघर्ष सुरू असतो तो एका छोट्याशा घरकुलासाठी. झोपडपट्‌ट्या, चाळी, जीर्ण-जुन्या इमारतींनी मुंबईचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला आहे. यामधील प्रत्येक माणसाचे स्वप्न असते घरकुलाचे ! मुंबईतील जागेच्या गगनाला भिडणाऱ्या किमती पाहता मुंबईतील स्वप्नाळू माणसाचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होईल का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. परंतु अमिबासारख्या पसरलेल्या झोपडपट्‌ट्या आणि विविध अतिक्रमणे ही मुंबईच्या विकासातील मोठी अडचण आहे. याचा विचार होत असतानाच महाराष्ट्र शासनातर्फे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए), मुंबई व मुंबईलगतच्या नागरी विभागांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेतला. एमएमआरडीएच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयुटीपी) आणि मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प (एमयूआयपी) या दोन योजनांमुळे मुंबईच्या विकासाला चालना मिळाली आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुक व्यवस्था, त्यांची सुधारणा, पूल, रस्ते अशा पायाभूत सुविधा हाती घेत असताना तेथील प्रकल्प बाधीतांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाची योजना राबविली. एसआरएच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्याचा काही अंशी प्रयत्न झाला. मात्र या योजनांमध्येही मोठा गोंधळ आहे. काही ठिकाणी बिल्डरांनी सामान्य जनतेला नाडण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी समाजकठंकानी ताकदीच्या बळावर सामान्य जनतेची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी भक्षक ठरले. पदाधिकारी व झोपडीधारकांनी संगनमत करून एकेका झोपडीचे दोन-चार भाग करून अधिक सदनिका लाटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शासनाच्या या योजना बदनाम झाल्या. या गोष्टी "मुंबई मित्र'चे मालक संपादक अभिजीत राणे यांच्या लक्षात येताच त्यांनी यासंबंधीच्या बातम्या गोळा करण्याचे आदेश आम्हाला दिले. त्यातूनच आम्ही गोरेगाव, धारावी, घाटकोपर, मालाड, कांदिवली, अंधेरी आणि इतर अनेक शासकीय योजनेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. त्यातून अनेकांना न्याय मिळाला. त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणूनच या आघाडीवरही "मुंबई मित्र' मुंबईकरांचा खराखुरा मित्र बनला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेली "महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम' राज्यभरात राबविण्यात आली. या मोहिमेचे महत्त्व लक्षात येताच आम्ही ती राज्यातील तळागाळातपर्यंत पोहचवली. खरे तर या मोहिमेमुळे पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी होणार होता. ही योजना सर्व वर्तमान पत्रांनी उचलून धरायला हवी होती. पण आर.आर.पाटील यांच्या या योजनेला वर्तमान पत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र "मुंबई मित्र'नी ही योजना स्वत:ची समजून ती उचलून धरली. त्यामुळे काही गावगुंड नाराज झाले. पण त्यांची पर्वा न करता "मुंबई मित्र'ने आपले कर्तव्य पार पाडले आहे.
गृहमंत्रालयाची ही योजना उचलून धरतानाच महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याची लक्तरे मात्र आम्ही वेशीवर टांगले. महाराष्ट्राच्या सहकार खात्यात भ्रष्टाचार अगदी शिगेला पोहचला आहे. सहकार खात्याचे अधिकारी मनमानी करताहेत. सहकार खाता स्वाहाकार बनला आहे. पण सहकार खाते पडले डॉ. पतंगराव कदमांचे! ते तर भावी मुख्यमंत्री! त्यांच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, असा राज्यातील वर्तमान पत्राना प्रश्न पडला. पण तिथेही सहकाराने पिचलेल्या - नाडलेल्या लोकांच्या मदतीला धावून आलाङ्घमुंबई मित्र'च. भावी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवली तरी चालेल पण खात्यातील भ्रष्टाचारावर आसूड ओढा, नव्हे लेखणीच्या तलवारीच चालवा, असा आदेशच मालक संपादक अभिजीत राणे यांनी दिला. त्यातूनच मग आम्ही सहकार खात्यातील भ्रष्टाचाराच्या अनेक बातम्या छापल्या. तिथेही "मुंबई मित्र'ला पिचलेल्या नाडलेल्या लोकांचा दुवाच मिळाला.
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानात मोठ्या प्रमाणावर होत असलेला भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला. संस्थानच्या भ्रष्ट विश्वस्तांनी भाडोत्री गुंडांकरवी आम्हाला मारण्याच्या व कार्यालयाची तोडफोड करण्याच्या धमक्या दिल्या. परंतु धमक्यांना न घाबरता शिर्डी संस्थानातील भ्रष्टाचार आम्ही सप्रमाण मांडला. त्याची दखल संस्थानला घ्यावी लागली. शिर्डीतील भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा डाव आखण्यात आला होता. कोणतीही मंजूरी, परवानगी, नसताना शिर्डीतील हेलिपॅॅडचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्याचा घाट रचला असल्याचे वृत्त "मुंबई मित्र'च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले आणि मंत्रालय ते शिर्डी एकच खळबळ उडाली. अखेर तो कार्यक्रम रद्द करून नंतर सोयीस्कर परवाने घेतल्यानंतरच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन संपन्न झाले. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या मदतीतही घोळ होत असल्याचे आम्ही सर्वप्रथम उघडकीस आणून दिले.
मुंबईतील मनपा रूग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या रूग्णांना अतोनात छळले जाते. बेफिकीर कर्मचारीवर्ग आपल्याच मस्तीत दंग असतो याचे बिंगही "मुंबई मित्र'ने फोडले. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया यांचे अनैतिक संबंध,सिद्धार्थ रूग्णालयातील अनागोंदी कारभार पुराव्यांसह, नावानिशी जाहिर केल्याने अनेकांचे धाबे दणाणले. काही डॉक्टर निलंबित झाले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. हे काम फक्त "मुंबई मित्र'च करू शकतो, हे सिद्ध झाले.
खासगी बॅंकींग क्षेत्रामुळे आज सर्वच शासकीय बॅंकांनाही आपला दर्जा सुधारावा लागला आहे. दर्जेदार सेवेद्वारे सर्व बॅंका ग्राहकांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल हा उद्देश ठेवतात. मात्र युनियन बॅंकेत ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचे आमच्या निदर्शनास येताच आम्ही त्या कर्मचाऱ्यांविरोधातही आवाज उठविला. अखेर बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा झाली. ग्राहक राजा खूष झाला आणि तो कायमचा आमचा मित्र झाला.
हे सर्व करीत असताना सामाजिक, शैक्षणिक जाणीव समोर केंद्रीत करून सर्वसामान्य, गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या उद्देशाने दरवर्षी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. मागच्या वर्षी मुंबई-ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली. यावेळी 750 स्पर्धकांनी सहभाग घेतला तर 80 स्पर्धकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी दहिदंडी उत्सव, गणेशोत्सव विसर्जन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 26 जानेवारी रोजी झालेल्या "साहस शिबीरात' 350 जणांनी सहभाग घेतला होता.
शैक्षणिक क्षेत्रातही भ्रष्टाचाराची किड मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. नर्सरी, केजी, कॉलेज ऍडमिशनसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण होते. यावरही "मुंबई मित्र'ने जोरदार आवाज उठविला. चेक नाक्यावरील वेशाव्यवसाय, जकातचोरी उघडकीस आणली. अलिबागमधील रेशनिंगचा घोटाळा उघडकीस आणल्याने पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली. मतदार नोंदणी व ओळखपत्र वाटपात होत असलेला सावळागोंधळ आम्ही पुराव्यांसह प्रसिद्ध केला. मनसे आणि सपा यांच्या कार्यकर्त्यांत दादरमध्ये झालेल्या दंगलप्रकरणी माहिती देण्यासाठी आमचे छायाचित्रकार प्रमोद देठे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यास मदत केली. आम्ही प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांचीच या प्रकरणात विशेष दखल घेण्यात आली. आणि राज ठाकरे व काही कार्यकर्त्यांवरील आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यामुळे सिद्ध झाले. त्यासाठी पोलिसांनी आम्ही प्रसिद्ध केलेेली छायाचित्रे महत्त्वपूर्ण ठरली.
या दरम्यान गोरेगाव येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या "गर्जतो मराठी' या कार्यक्रमावर आधारीत "मुंबई मित्र'चा विशेषांक शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते वसंत व्याख्यान मालिका विषेशांकाचे प्रकाशन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जानेवारी रोजी "हिंदूंचे सरसेनापती' या विशेषांकाचे प्रकाशन केले.
शिवरायांच्या प्रेमाचा उमाळा अनेकांना येतो. निवडणुकीच्या तोंडावर तर तो अधिक प्रखर होतो. पण शिवरायांबद्दल बेगडी प्रेम दाखवणाऱ्यांवरही "मुंबई मित्र' ने प्रहार केला आहे. 1998 साली शिवरायांना जन्म देणाऱ्या जिजाऊ आणि बाळराजे शिवाजी यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात झाले. पण पुढे त्याचे सर्वानांच विस्मरण झाले. या पुतळ्याची निगा राखली जात नव्हती. त्याची साफसफाई होत नव्हती. म्हणून यावर्षी 12 जानेवारीला महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुबंई महानगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी मालक-संपादक अभिजित राणे यांनी स्वत: या पुतळ्याची साफसफाई करून जिजाऊ आणि बाळराजे शिवाजींच्या पुतळयाला पुष्पहार घातला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आता या पुतळ्याची निगा योग्य प्रकारे राखली आहे. त्यावर आमचे बारीक लक्ष आहे. पुढे भविष्यात पुन्हा दुर्लक्ष झाले. तर आमची लेखणी आसूड ओढेलच, पण आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरायलाही मागेपुढे पहाणार नाही, हेच मालक-संपादक अभिजीत राणे यांनी जाहिर केले आहे.
गेल्या तीन वर्षाच्या "मुंबई मित्र'च्या वाटचालीत आम्ही जे जे चांगले आहे ते त्वेषात मांडले. पण जे जे वाईट आहे, ते सुद्धा तितक्याच त्वषात मांडले. पक्ष कोणताही असो, आम्ही त्यंाच्या चांगल्या कार्यक्रमांना मानाचे स्थान दिले. पण कार्यक्रम वाईट असेल, तर मग तोच न्याय लावत पक्ष कोणताही असला तरी त्यावर टिका केली आहे. म्हणूनच "मुंबई मित्र' गेल्या तीन वर्षात कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधला गेला नाही. अगदी आचार्य अत्रेंच्या भाषेत सांगायचे तर येत्या दहा हजार वर्षातही हे घडणार नाही. याचे कारण मालक संपादक अभिजित राणेच! वेळ पडली तर अर्धी भाकरी खाऊ, पण कुणाची गुलामी करायची नाही, हा मंत्र त्यांचाच. त्यातूनच मुंबई मित्र निष्पक्ष भूमिका बजावतो आहे.
गेल्या तीन वर्षात आम्हाला बऱ्याच जणांनी आजमावयाचा प्रयत्न केला, भ्रष्ट करायचा प्रयत्न केला, धमकवायचा प्रयत्न केला, हल्ला करायचा प्रयत्न केला. साम-दाम-दंड-भेद सर्व प्रकारांनी आम्हाला काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर आम्हाला संपवण्याचे मनसूबे रचले. पण अशा अफजलखांनाचे कोथळेच "मुंबई मित्र' ने वेळोवेळी आपल्या लेखणीच्या सहाय्याने बाहेर काढले. आम्ही भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांना फोडले, अधिकाऱ्यांनाही फोडले, त्याचबरोबर या भ्रष्ट गटारगंगेत मुक्तपणे विहारू पाहणाऱ्या आमच्या पत्रकार बंधूनांही सोडले नाही. त्यांनाही आमच्या लेखणीचा तडाखा मिळाला. गेल्या तीन वर्षात "मुंबई मित्र' ने रोज एकेक पाऊल पुढेच टाकला. त्याला मागे वळून पहावे लागले नाही.यासाठी मालक- संपादक अभिजित राणे यांचे लखलखते नेतृत्त्व कारणीभूत आहे. पण तसेच कारणीभूत आहे आमच्या वाचक मित्रांचे अपार प्रेम. त्यांच्या प्रेमातूनच गेल्या तीन वर्षात आम्ही मुंबईच्या सीमा ओलांडून राज्यभर पसरलो. भाषेच्या सीमा ओलांडून हिंदी व इंग्रजीतही आलो. ही गरूडभरारी आहे. पण ही गरूडभरारी मारताना आमचे मन आकाशात असले, तरी पाय जमिनीवर आहेत. म्हणूनच "मुंबई मित्र' ला यशस्वी होण्यासाठी सहकार्य, प्रेम, आशिर्वाद देणाऱ्या सर्वच ज्ञान-अज्ञातांना आमचे लाख-लाख धन्यवाद, त्रिवार, प्रणाम आणि मानाचा मुजरा!
- राजेश सावंत

No comments: